| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकून बुडू लागलेल्या पुण्यातील पर्यटकाचा जीव जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावला. क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेत चार जीवरक्षकांनी शर्थीचे प्रयत्न करत पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले. या धाडसी कामगिरीमुळे जीवरक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ही घटना सोमवारी (दि.13) दुपारी घडली.
पुणे जिल्ह्यातील काळेवली फाटा येथील शाहरुख शेख (30) हा पर्यटक अलिबाग येथे फिरण्यासाठी आला होता. दुपारच्या सुमारास तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला. मात्र, भरतीचे पाणी आणि वेगवान लाटांचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊन बुडू लागला. मदतीसाठी त्याची धडपड सुरू असतानाच किनाऱ्यावर तैनात असलेल्या जिवरक्षकांनी ही घटना पाहिली.
जीवरक्षक प्रथमेश सारंग, कुणाल सारंग, निलेश कामतेकर आणि महेश पाटील यांनी तात्काळ आवश्यक सुरक्षा साहित्य घेऊन समुद्रात उडी मारली. जीवाची पर्वा न करता केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्यांनी शाहरुख शेख याला सुखरूप किनाऱ्यावर आणले. त्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
अलिबाग समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, सीसीटीव्ही यंत्रणेसह विविध सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही या जीवरक्षकांनी अनेक पर्यटकांचे प्राण वाचविले असून, त्यांच्या तत्परतेमुळे पुन्हा एकदा संभाव्य दुर्घटना टळली आहे.







