| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिळक रोड परिसरातील एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने तब्बल 10 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भारती प्रदीप कदम (53) यांच्या राहत्या घरात मंगळवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास चोरी झाली. तक्रारदार घर बंद करून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचा शाही हार, पाटल्या, मोठे व छोटे मंगळसूत्र, सोन्याच्या चेन, कानातील दागिने, नथ, रिंग्ज, नेकलेस तसेच रोख रकमेचा समावेश असून एकूण 13.25 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मिळून सुमारे 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, पुरावे संकलित करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.







