72 चारचाकी व 96 दुचाकी वाहनांसाठी आधुनिक पार्किंगची सुविधा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वाहनतळाच्या अपुऱ्या सुविधेवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने बसस्थानकासमोरील आरक्षित जागेवर 13 कोटी 20 लाख 70 हजार 882 रुपये खर्चून बहुमजली यांत्रिकी वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर बुधवार (दि.22) रोजी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन मंजुरी दिली जाणार आहे.
पालिकेची सर्वसाधारण सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली असून, या सभेपुढे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे अनेक विषय ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये बहुमजली यांत्रिकी वाहनतळाचा विषयही प्रमुख मानला जात आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यातील पनवेल शहरातील अंतिम भूखंड क्रमांक 184/1 ए (पार्ट) हा वाहनतळासाठी आरक्षित आहे. सध्या या ठिकाणी दुचाकी वाहनांचे पार्किंग होत असले तरी पनवेल बसस्थानक, बाजारपेठ आणि व्यापारी परिसरामुळे वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने विद्यमान व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे या ठिकाणी आधुनिक यांत्रिकी बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने नियुक्त केलेल्या तांत्रिक सल्लागार मे. एंजल कन्सल्टंट यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार या प्रकल्पात 96 दुचाकी आणि 72 चारचाकी, अशी एकूण 168 वाहनांची पार्किंग क्षमता उपलब्ध होणार आहे. यासाठी उभ्या (व्हर्टिकल रोटरी) आणि टॉवर पार्किंग प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 13.20 कोटी रुपयांचे ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यामध्ये जीएसटी व इतर आकस्मिक खर्चाचाही समावेश आहे. प्रस्तावित मॅकेनाईज्ड पार्किंग टॉवरचे आयुर्मान सुमारे 20 वर्षे राहणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळते का, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.







