राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आदित्य पवारांचा इशारा
| पनवेल | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आदित्य पवार यांनी पदभार स्वीकारताच अवैध दारूविक्री, गावठी दारूच्या भट्ट्या आणि बेकायदेशीर मद्य वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. “अवैध धंदे करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर शासकीय सेवेत प्रवेश करून त्यांनी विविध ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. हिंगोली येथे कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूविरोधात विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. 23 ते 25 मे 2026 या कालावधीत झालेल्या विशेष कारवाईत 21 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कारवाईदरम्यान गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या, अवैध दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करण्यात आली आणि सुमारे 1.65 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
रायगड जिल्ह्याबाबत बोलताना आदित्य पवार म्हणाले की, जिल्ह्यातील गावठी दारूच्या भट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल. तसेच दिव-दमनमधून होणारी अवैध दारूची वाहतूक आणि काही बार-रेस्टॉरंटमधून होत असलेल्या छुप्या मद्यविक्रीवरही कठोर कारवाई केली जाईल. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता ठेवून सर्व तालुकास्तरीय कार्यालयांच्या कामाचा सातत्याने आढावा घेत नागरिक आणि परवानाधारक व्यावसायिकांची कामे वेळेत मार्गी लावण्यावर भर देणार असल्याचेही आदित्य पवार यांनी स्पष्ट केले.






