36 तासांत दुचाकी चोर जेरबंद; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानाव येथून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या 36 तासांत शोधून काढत आरोपीला अटक करण्यात रेवदंडा पोलिसांना यश आले आहे. चोरीस गेलेली टीव्हीएस एनटॉर्क मोटारसायकल ही पोलिसांनी जप्त केली आहे.
खानाव येथील जितेश भास्कर पाटील (33) यांनी 16 जुलै रोजी रात्री आपली टीव्हीएस एनटॉर्क 125 सीसी (एमएच-06-सीएस-8745) ही दुचाकी घराच्या अंगणात उभी केली होती. 17 जुलै रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या देखरेखीखाली पीएसआय अंगज यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासात आरोपी चोरीची दुचाकी घेऊन पेण-पनवेल मार्गे जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांच्या मदतीने पळस्पे परिसरात नाकाबंदी करण्यात आली. या कारवाईत पोलीस कर्मचारी मनीष ठाकूर, तुषार पारवे, केदारनाथ साखरकर आणि समीर धुरी यांनी आरोपी शंकर मंगल गिलवा (33) रा. चंपागड, ता. राऊरकेला, जि. सुंदरगड, ओडिशा याला चोरीच्या मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. अवघ्या 36 तासांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक करण्यात आल्याने रेवदंडा पोलिसांच्या तांत्रिक तपास आणि तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मनीष ठाकूर करीत आहेत.







