बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा
| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने आता पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने 21 जुलैसाठी राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राजस्थानपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच मध्य भारत आणि पूर्व किनारपट्टीवर निर्माण झालेल्या चक्रीय हवामान प्रणालींमुळे मोसमी वाऱ्यांना वेग आला असून त्याचा परिणाम म्हणून राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण वाढत आहे. सोमवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी सुरुवातीला यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने तो ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला.
कोकणातही पावसाचा जोर वाढणार
या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीएवढा पाऊस होण्याची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महिन्याच्या अखेरीसही पावसाची तूट पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता कमी आहे. रायगड जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. रत्नागिरी आणि रायगडसाठी 21 जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भात पाऊस असमाधानकारक
राज्याच्या बहुतांश भागांत मान्सून सक्रिय झाला असला तरी विदर्भात पावसाची स्थिती अद्याप समाधानकारक नाही. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये केवळ हलक्या स्वरूपाच्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.







