कृष्ण चौक आळीचा पूल खचला
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील खारापटी गावातील कृष्ण चौक आळी येथील सुमारे 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला लहान पूल अखेर कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने ही दुर्घटना घडली त्यावेळी पुलावरून कोणतीही व्यक्ती अथवा सायकलसह अन्य लहान वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूल सन 1996 मध्ये तत्कालीन ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पंढरीनाथ पोकळे यांच्या कार्यकाळात बांधण्यात आला होता. या कामाचा ठेका संदीप चोरगे यांनी घेतला होता, तर बांधकामाचे काम लक्ष्मीनगर गावातील अनुभवी गवंडी उत्तम दाभाडे यांनी केले होते. दगड, खडी, वीट आणि सिमेंटचा वापर करून त्या काळातील उपलब्ध तंत्रज्ञानानुसार हा पूल उभारण्यात आला होता.
मात्र, कोकणातील दरवर्षीचा मुसळधार पाऊस, ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा वाढता वेग आणि कालांतराने झालेली नैसर्गिक झीज यामुळे पुलाची मजबुती कमी होत गेली असावी, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अखेर सततच्या पावसाच्या तडाख्यामुळे पुलाचा काही भाग कोसळून पडला. पूल कोसळल्याने स्थानिक नागरिकांची दैनंदिन ये-जा विस्कळीत झाली असून, विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नवीन पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तोपर्यंत दुर्घटनास्थळी संरक्षणात्मक उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.







