वढावमध्ये सहा दिवसांपासून पाणीबाणी; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन
| पेण | प्रतिनिधी |
पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी ग्रामस्थांना सहा-सहा दिवस वाट पाहावी लागत असेल, तर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिकच आहे. पेण तालुक्यातील वाशी खारेपटा-वढाव गावात गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर गावातील शाळकरी मुलांनीच हातात फलक घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रश्न मांडण्यासाठी चिमुकल्यांवर ‘रिपोर्टर’ बनून आपली व्यथा मांडण्याची वेळ आली, हेच या समस्येचे गांभीर्य दाखवणारे चित्र आहे.
गावातील रुद्र म्हात्रे आणि त्याच्या मित्रांनी हातात ‘पेण खारेपाट 2026 पाणीप्रश्न’ असा फलक घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रुद्रने व्हिडिओच्या माध्यमातून गावातील पाणीप्रश्न मांडत नवीन जलवाहिनी टाकून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. ‘पाणी नाही, त्यामुळे कधी कधी शाळेत आंघोळ न करताच जावे लागते,’ ही त्याची व्यथा ऐकूनही प्रशासनाची संवेदना जागी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सहा दिवसांपासून नळ कोरडे आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ सुरू आहे. शाळकरी मुलांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत आहे. नेमका बिघाड कुठे आहे, जलवाहिनीची समस्या आहे की अन्य तांत्रिक अडचण, याची तातडीने पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
पाण्यासाठी मोठ्यांनी आवाज उठवला; आता चिमुकल्यांनीही सवाल केला. ‘घरात पुराचे पाणी येऊ शकते, तर पिण्याचे शुद्ध पाणी का येऊ शकत नाही?’ या एका प्रश्नात गावकऱ्यांची संपूर्ण व्यथा दडली आहे. चिमुकल्यांना पाण्यासाठी हातात फलक घेऊन सरकारला जागे करण्याची वेळ येणे, ही केवळ वढावची समस्या नसून, मूलभूत सुविधांच्या अंमलबजावणीवर विचार करायला लावणारी परिस्थिती आहे.






