दोन जणांविरुद्ध गुन्हा; 921 पाकिटांचा साठा हस्तगत
। पनवेल । प्रतिनिधी ।
करंजाडे सेक्टर-5 परिसरात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आल्याने पनवेल शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण 921 पाकिटे असा 6 हजार 897 रुपये 50 पैसे किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी रोहित भारत लोकारे यांच्या तक्रारीवरून पवनकुमार ओमप्रकाश मौर्या (31) आणि ध्यानसिंग रामस्वरूप पाल (32), दोघेही रा. करंजाडे, यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील कथित पुरवठादार अमित हा फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजाडे सेक्टर-5 येथील फॅमिली पान शॉप, मेट्रो केमिस्टसमोर तपासणी करण्यात आली. त्यावेळी पवनकुमार मौर्या याच्या ताब्यात विविध प्रकारचा पानमसाला व सुगंधित तंबाखूची 468 पाकिटे आढळून आली. या साठ्याची किंमत 3 हजार 513 रुपये 50 पैसे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ध्यानसिंग पाल याच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या पानमसाला व तंबाखूची 453 पाकिटे जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत 3 हजार 383 रुपये 50 पैसे आहे. दोन्ही ठिकाणच्या कारवाईत एकूण 921 पाकिटे जप्त करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या पदार्थांची पुढील तपासणी आणि कथित पुरवठादाराचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील सरगर हे पुढील तपास करीत आहेत.






