13 जानेवारीला मभूमीपुत्र निर्धार परिषदफ
पनवेल | वार्ताहर |
पनवेल,उरण परिसरातील 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीच्यावतीने पुन्हा एकदा सिडको प्रशासनाच्याविरोधात एल्गार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यानिमित्ताने येत्या 13 जानेवारीला मभूमीपुत्र निर्धार परिषदफआयोजित करण्यात आली असून,त्या परिषदेत आंदोलनाची भूमिका ठरविली जाणार आहे.
पनवेल तालुक्यातील पुष्पकनगर येथील गणेश मंदिरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला 27 गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, खजिनदार संतोष पवार, उपाध्यक्ष गोवर्धन डाऊर, सी टी पाटील, करण भोईर, अॅड .प्रशांत भोईर, प्रेम पाटील, किरण केणी, चेतन डाऊर, कैलास तारेकर, अॅड. राहुल मोकल, ऍड.प्रदीप मुंडकर, सल्लागार पुंडलिक म्हात्रे, जयवंत परदेशी, गजानन पाटील, विष्णू जितेकर, प्रवक्ते रुपेश धुमाळ, किरण पवार, सुनील कटेकर, उमेश खांदेकर, सचिन कांबळ उपस्थित होते.
सिडकोने विमानतळाची कामे जलद गतीने सुरू केली परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसह सदर संपादीत जमिनीचे नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्न, पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले प्रश्न तसेच विमानतळ भरावामुळे डुंगी, पारगाव, खालचे ओवळे, दापोली व भंगारपाडा या गावात पाणी साचत असल्याने त्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, असे महत्वाचे व इतर प्रश्न सिडकोने अद्यापपर्यंत सोडविलेले नाहीत. त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या इतरही अनेक प्रलंबित मागण्या सिडकोकडे प्रस्तावित आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दोन टप्प्यात आंदोलन
आंदोलनाचा पहिला टप्पा सिडकोच्या या अत्याराचाराच्या निषेधार्थ येत्या 13 जानेवारीला लोकनेते दि.बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या अध्यक्षतेखाली भूमीपुत्र निर्धार परिषद तसेच दुसरा टप्पा सिडकोचे लक्ष वेधण्यासाठी 24 जानेवारीला नवी मुंबई विमानतळात सुरू असलेली कामे बंद करण्याचे ठरविलेले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प राष्ट्रीय हिताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळेच आधी पुनर्वसन मग प्रकल्प हे शासनाचे धोरण असतानादेखील, विमानतळ उभारणी व पुनर्वसन हे समांतररीत्या करावयाच्या सिडको प्रशासनाच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सहकार्य करून प्रकल्प उभारणीस सुरूवात केली. सिडकोने विमानतळाची कामे जलद गतीने सुरू करून घरांचे व पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित असताना काही प्रकल्पग्रस्तांची घरे जबरदस्तीने जमीनदोस्त केली तसेच ज्यांनी स्वतःची घरे मोडून पुनर्वसन क्षेत्रात घरे बांधण्याकरीता सुरूवात केली असता सिडको पुनर्वसन क्षेत्रामध्ये सोयी सुविधा पुरविण्यास सिडको असमर्थता दर्शवित असून प्रकल्पग्रस्तांचे घरे बांधकाम प्रक्रियेत सिडको अडचणी निर्माण करीत आहेत. विशेष म्हणजे जोपर्यत घरे खाली होत नव्हती तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास रस असलेले सिडको प्रशासन आता घरे खाली केल्यानंतर प्रश्न सोडविण्यास नकारात्मकता दर्शवित आहे.







