भूमीपूजन कार्यक्रमात खा. तटकरेंची ग्वाही
। माणगाव । वार्ताहर ।
निजामपूर विभागात मोठ्या प्रमाणात येऊ घातलेल्या औद्योगिकीकरणातून मोठ्या प्रमाणात रोजगारच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या भागात व्यवसायाभिमुख शिक्षण घेतलेल्या तरुणांना या विविध कारखान्यातून मोठ्या प्रमाणत रोजगार मिळणार आहे. या कारखान्यात प्रथम स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार दिला जाईल. यासाठी राष्ट्रावादी कॉ. पक्षाने नेहमीच स्थानिकांची बाजू घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या भागात आगामी काळात येणार्या औद्योगिकीकरणातून मोठ्या प्रमाणात भूमीपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी ग्वाही खा. सुनील तटकरे यांनी निजामपूर, बामणगाव, जिते येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमीपूजन समारंभात बोलताना दिली.
निजामपूर येथील केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालय नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन तसेच बामणगाव येथील समाज मंदिराचे भूमीपूजन व जिते येथील नूतन अंगणवाडी इमारतीचे भूमीपूजन दि. 8 जानेवारी शनिवारी सायंकाळी खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रावादी कॉ. पक्षाचे महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा अध्यक्ष बाबू खानविलकर, निजामपूर विभाग अध्यक्ष संदीप जाधव, निजामपूर ग्रा.पं. सरपंच राजाभाऊ रणपिसे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बाळाराम दबडे, शिरसाड ग्रा. पं. उपसरपंच चंद्रकांत नलावडे, सचिव किरण पागार, पानसई विभाग अध्यक्ष भिकू धाडावे, निजामपूर शिवसेना माजी विभाग प्रमुख प्रसाद गुरव यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.







