रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, साईडपट्ट्यांची दुर्दशा, झाडाझुडपांचा विळखा
बांधकाम खात्याला मुहूर्त सापडेना
| मुरूड | वार्ताहर |
मुरुड-गारंबी मार्गे रोहा रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्या असून, त्या अजूनही तशाच आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढलेली असून, अद्याप तशीच आहेत. पावसाळा तोंडावर आला तरी बांधकाम खात्याला काही मुहूर्त सापडेना.
मुरूड-गारंबीमार्गे रोहा हा अगदीच जवळचा मार्ग आहे. या मार्गावर गारंबी धरणावर पर्यटक आवर्जून भेट देत असतात. त्यामुळे रोहामार्गे मुरुडला येताना हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर रहदारी असते. या मार्गावरून येताना अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झालेले आहेत. वर्षभरात बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या निसरड्या झाल्या आहेत, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडेझुडपे अजूनही तशीच आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. बांधकाम खात्याने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, रस्त्याच्या साईडपट्ट्या सुस्थितीत कराव्यात व रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडेझुडपे तोडण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून, पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे. मुरूडकडे कायम बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असते, हा बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिकारात असल्याने बांधकाममंत्री याकडे लक्ष देतील का? असा सवाल निर्माण होत आहे.