| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका चालकांच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने अंतर्गत संघटनेच्या फलकाचे अनावरण तसेच कंत्राटी चालकांच्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक, अलिबाग कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी धडक दिली.
यावेळी कंत्राटदाराकडून सुरु असलेल्या चालकांच्या पिळवणूकीबाबत मनसे नेत्यांनी जाब विचारत मनसे स्टाईलने प्रसाद देखील दिला.
रुग्णवाहिका चालकांचा ६ महिन्यांचा पगार न देता उलट त्यांच्याकडूनच कंत्राटदाराच्या मॅनेजरची चहापाणी म्हणून १५००० रुपयांची मागणी केली जाते. तसेच मागणी मान्य नाही केली तर कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जाते. ठरलेल्या कामाव्यतिरिक्त चालकांकडून इतरही कामे करुन घेतली जातात.
कंत्राटदारास शासनाकडून प्रती चालकास महिन्याला साधारण १५९०० इतके वेतन दिले जात असतानाही कंत्राटदार मात्र प्रती चालकास महिन्याला ९ हजार इतकेच वेतन देत होता.
रुग्णवाहिका चालवणे हे चालकासाठी नेहमीच जीव मुठीत धरून काम करण्यासारखे असते. त्यांचा विमा काढणे बंधनकारक असतानाही कोणत्याही प्रकारचा विमा कंत्राटदाराकडून काढण्यात आला नव्हता. या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठीच मनसेची जिल्हा सामान्य रुग्णालयावर धडक दिली.
यावेळी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष. मुरलीधर पाटील,सिध्दू म्हात्रे, विनायक पालेकर, जितेंद्र भोईर, सचिन डाकी, अरुण ठाकूर, मनसेचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.