रुपेश पाटीलच्या विरोधात गुन्हा दाखल
| पनवेल | वार्ताहर |
युवा सेनेमधून शिंदे गटामध्ये गेलेल्या रुपेश पाटील यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यामध्ये हाणामारी, धमकी आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस प्रोटेक्शन असताना त्यांनी एका गाळेधारकांना मारहाण केली आहे. त्याचबरोबर जीवे ठार मारण्याचीसुद्धा धमकी देण्यात आली आहे.
खारघर सेक्टर 10 मध्ये अनमोल प्लॅनेट ही इमारत आहे. या सोसायटीचे रुपेश पाटील हे चेअरमन आहेत. दरम्यान, या ठिकाणी मनीष ठाकूर यांच्या मालकीचा गाळा आहे. त्याठिकाणी ते रिअल इस्टेट कन्सल्टंट आणि यूज कार डीलरचे काम करतात. बुधवारी त्यांनी आपल्या गाळ्यासमोर आय टेन गाडी उभी केली होती. काही वेळाने रुपेश पाटील यांनी मनीष ठाकूर यांना फोन करून तुमच्याकडे येत असल्याचे सांगितले. मी ऑफिसमध्येच आहे, आपण येऊ शकता, असे ठाकूर यांनी सांगितले. काही वेळातच बंदूकधारी पोलीस घेऊन रुपेश पाटील त्या ठिकाणी आले. त्यांच्यासमवेत आणखी चार जण होते. या ठिकाणी कार का लावली अशी विचारणा करीत लागलीच शिवीगाळ करण्यास त्यांनी सुरुवात केली असल्याची तक्रार ठाकूर यांनी पोलिसांना दिली आहे. आपण याबाबत मीटिंग घ्या अशी विनंती संबंधित गाळेधारकांनी केली. मात्र, त्याचे काहीही न ऐकता रुपेश पाटील आणि त्यांच्या बरोबर आलेल्या व्यक्तीने मनीष ठाकूर यांना मारहाण केली. याबाबत मनीष ठाकूर यांनी खारघर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या आदेशानुसार रुपेश पाटील आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.