| श्रीवर्धन । वार्ताहर ।
लहरी व खराब हवामानामुळे बागायतदारांना खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे. कारण नारळ व सुपारीच्या उत्पन्नामध्ये यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावरती लक्षणीय घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने हरिहरेश्वर व श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरील नारळ व सुपारीच्या वाड्या अक्षरशः झोपवून टाकल्या होत्या. नारळ व सुपारी ची 70 टक्के झाडे अर्ध्या वरून मोडून पडली तर काही बुंध्यातून उन्मळून पडली. त्यामुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. परंतु यावर्षी अति पडलेला पाऊस, त्याचप्रमाणे थंडी पडायला लागल्यानंतर देखील वातावरणात होत असलेले बदल यामुळे नारळ व सुपारीच्या फुलांना गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे.
चार दिवस कडाक्याची थंडी पडते तर आठ ते दहा दिवस उष्मा जाणवतो. यामुळे झाडांना आलेल्या नवीन फुलांना बुरशी सदृश्य रोग होऊन फुले गळून पडतात. तसेच खारकुंड्या व इतर पक्षी देखील नवीन आलेल्या फुलांचा खूप मोठ्या प्रमाणावरती नाश करतात. त्यामुळे देखील उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट होत असते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना सुपारीची रोपे मोफत दिली असली तरी सदरची रोपे मोठी होऊन त्याला फळे येण्यासाठी कमीत कमी सात ते आठ वर्षाचा कालावधी लागतो. तसेच नारळाची नवीन रोपे लावल्यानंतर सुद्धा त्याला फळे येण्यासाठी आठ ते नऊ वर्षाचा कालावधी लागत असल्याने श्रीवर्धन हरीहरेश्वर परिसरातील बागायतदार पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेला पाहायला मिळत आहे. वादळानंतर शासनाने दिलेली नुकसान भरपाई अत्यल्प स्वरूपाची असल्याने बागायतदारांचे कधीही न भरून येणारे नुकसान झालेले आहे. त्यातच यावर्षी लहरी व खराब हवामानामुळे देखील शेतकर्यांना किती उत्पन्न हातात येईल? याबाबत चिंता लागून राहिलेली आहे.