। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग आणि महिला विकास कक्ष विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डायरेक्टर प्रा. विक्रांत वार्डे कला शाखा विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील, भूगोल विभाग प्रमुख प्रा. दिनेश पाटील, इतिहास विभाग आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मिलिंद घाडगे, प्रा. भाग्यश्री गायकवाड, प्रा. अमिता महाले इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थी ऋतुजा गायकवाड, मृणाली पाटील, वेदांत कंटक यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. इतिहास विभाग प्रमुख प्रा.मिलिंद घाडगे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वास्तविक जीवनावर ऐतिहासिक प्रकाश टाकला. तसेच कला शाखा प्रमुख प्रा. नम्रता पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासावर भाष्य केले.
आपल्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे डायरेक्टर प्रा. विक्रांत वार्डे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भारतीय स्त्रियांच्या सुधारनेतील कर्तव्यनिष्ठा अधोरेखित केली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागाच्या प्रा. भाग्यश्री गायकवाड यांनी केले.