| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेणसे, झोतिरपाडा, मुंढाणी, शिहू आणि कुहिरे या पाच ग्रामपंचायती अंबा नदी आणि खाडीमुळे 75 वर्षांपासून दुर्गम बनल्या आहेत. तालुक्याचे ठिकाण आणि मुख्य रस्त्याला जोडणारा पूल व्हावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे यांनी अंबा नदीवर दि. 24 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी अंबा नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा उपोषणकर्ते उद्धव कुथे यांनी दिला आहे. पाच ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
मुख्य रस्त्यापासून केवळ दीड किलोमीटर आणि तालुक्याचे ठिकाण असलेल्या पेण शहरापासून केवळ 12 किलोमीटर लांब असलेल्या या पाच ग्राम पंचायतीतील ग्रामस्थांमध्ये अंबा नदी आणि खाडी असल्याने 40 किलोमीटर इतके अंतर पार करावे लागते. यासाठी बेणसे ते कोलेटे दरम्यान अंबा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
दरम्यान, पाच ग्रामपंचायती खाडीच्या पलीकडे असल्यामुळे संबंधित तालुक्याला प्रत्येक कामाकरीता ये-जा करण्यासाठी रोहा तालुक्यातून नागोठणेमार्गे पेण येथे जावे लागत आहे किंवा अलिबाग तालुक्यातून पोयनाडमार्गे पेणला जावे लागत आहे. दोन्ही मार्गाने पेण येथे गेल्यास 40 कि.मी. प्रवास जाणे व 40 कि.मी. येणे एवढा अनाठायी प्रवास करावा लागतोय. त्यामुळे ग्रामस्थांचा वेळ, पैसा व शारीरिक श्रम वाया जात आहे. अनेकदा प्रशासन दरबारी कोलेटी ते बेणसे यांच्यामध्ये असणार्या या खाडीवर पूल बांधून ग्रामस्थांची समस्या दूर करावी, असे पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, याकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.
मात्र प्रशासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या इशार्यानुसार दि. 24 जानेवारी रोजी बेणसे बंदर, अंबानदी खाडी किनारी आमरण उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. उपोषणकर्ते उद्धव कुथे सदरची मागणी मान्य न झाल्यास दि. 26 जानेवारी रोजी विष प्राशन करून अंबा नदीमध्ये जलसमाधी घेणार आहेत. मी जलसमाधी घेऊन पुलाचे काम होत असेल तर माझी आणि माझ्या परिवाराची कोणतीच हारकत नाही. परंतु, उपोषण करत असताना तसेच जलसमाधी घेत असताना कायदा सुव्यवस्था बिघडल्यास संबंधित अधिकार्यांची सर्वस्वी जबाबदारी राहील, असा इशारा उद्धव कुथे यांनी दिला आहे.
यावेळी उद्धव कुथे सदस्य ग्रामपंचायत बेणसे, अरुण कुथे कामगार नेते, राजेश गोरे सदस्य ग्रामपंचायत बेणसे, दत्तात्रेय सुरावकर, यशवंत कुथे, महादेव कुथे, तुळशीराम कुथे आदींसह नागरिक, महिला ग्रामस्थ उपस्थित होते.