| उरण | वार्ताहर |
म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील उरण पोलीस वसाहतीची दुरावस्था झाली आहे. सध्या या वसाहतीच्या आवारात गवत, झाडेझुडपे वाढली असल्याने वसाहतीचा ताबा हा सरपटणार्या प्राण्यांनी घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
उरण, मोरा-सागरी आणि न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी शासनाने नवीमुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत सुसज्ज तीन मजली इमारतीची उभारणी केली. मात्र दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या पोलीस वसाहतीच्या इमारतीकडे शासनानी, पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सदर पोलीस वसाहतीच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. सध्या या वसाहतीच्या आवारात गवत झाडेझुडपे वाढली असल्याने वसाहतीचा ताबा हा सरपटणार्या प्राण्यांनी घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरी नवीमुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उरण म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील सदर पोलीस वसाहतीच्या इमारतीची पाहणी करून संबंधितांना सदर इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी चक्क पोलीस कर्मचारी वर्ग तसेच म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक करत आहेत.