शून्य शिक्षकी 160 तर एक शिक्षकी शाळा 568
| रायगड | प्रतिनिधी |
एकीकडे शिक्षण क्षेत्रात स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाची वाट असणाऱ्या रिक्त पदांमुळे बिकट झाली आहे. जिल्ह्याला शैक्षणिक गुणवत्तेच्या स्पर्धेत टिकवून ठेवणारी यंत्रणा रिक्त पदांनी ग्रासलेली आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांचा गट शिक्षणाधिकारी पदाचा भार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवंत आणि यशवंत बनविणाऱ्या शिक्षकांची एक हजार 531 पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यात शून्य शिक्षकी शाळा 160 तर 568 शाळांमध्ये शिकविण्यासाठी केवळ एक शिक्षक आहे. 166 केंद्र प्रमुखांची पदे रिक्त असल्याने शिक्षणाऐवजी अन्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना चाणाक्ष बनविण्याचे नियोजन बारगळत आहे. विशेष म्हणजे तब्बल 482 शाळा नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोन हजार 566 शाळा आहेत. शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे, असे असतानाही जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 482 शाळांची दुरुस्ती रखडली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सादर केले आहेत. या शाळांना दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीची प्रतीक्षा आहे. या दुरुस्ती रखडलेल्या शाळांमध्ये शिक्षक आहेत. विद्यार्थी आहेत पण शिक्षणाची अडचण होऊन बसली आहे. जिल्ह्यात असणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अपेक्षित असणाऱ्या गुरुजींच्या रिक्त पदांची संख्या डोळे विस्फारणारी आहे. मंजूर असणाऱ्या सात हजार 158 शिक्षकांपैकी पाच हजार 627 शिक्षक कार्यरत असून एक हजार 531 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामध्ये 100 उप शिक्षक आणि 533 पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे.
पटसंख्या घसरत असल्याने जिळ परिषदांच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामध्ये जिल्ह्यातील 30 शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला घ्यावा लागला. विद्यार्थी पट संख्येअभावी शाळा बंद करणे भाग पडले असलेतरी आता शिक्षक नसल्याने शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर येण्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शून्य पटसंख्या असलेली आता एकही शाळा नाही परंतु शून्य शिक्षक असलेल्या 28 शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीत. यामुळे येथे देखील प्रभारी शिक्षकांनाच शिक्षणाचा गाडा हकावा लागत आहे. जिल्ह्यात असणाऱ्या शाळांमध्ये तब्बल 568 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ एकच शिक्षकाची नियुक्ती आहे. असणाऱ्या शिक्षकाची सर्व वर्ग शिकविताना दमछाक होत आहे. पट संख्या, वर्ग आणि इमारत या निकषांवर मुख्याध्यापकांची पदे शासन मंजूर करते. यामुळे जरी जिल्ह्यात सात हजार 158 शाळा असल्यातरी मुख्याध्यापकांची केवळ 124 पदे मंजूर आहेत. लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे यापैकी मुख्याध्यापकांची 91 पदे रिक्त आहेत. जिल्ह्याला केंद्र प्रमुखांची 228 पदे मंजूर करण्यात आली आहेत . यापैकी 62 केंद्र प्रमुख कार्यरत असून केंद्र प्रमुखांची 166 पदे रिक्त आहेत. यामुळे शिक्षकांनाच केंद्र प्रमुखांचा डोलारा उचलावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला गटशिक्षणाधिकारी पद नियुक्त करणे क्रमप्राप्त आहे. परंतु जिल्ह्यात केवळ माणगाव आणि खालापूर या दोन तालुक्यांमध्येच पूर्णवेळ गट शिक्षणाधिकारी आहेत. जिल्ह्यातील अन्य 13 तालुक्यांमध्ये शिक्षणाची मदार प्रभारींवर आहे.
जिल्ह्यात बिंदू नामावली आणि संच मान्यता बनविण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील शून्य शिक्षक शाळा आणि एक शिक्षकी शाळांवर दुसरा शिक्षकाची नेमणूक होत नाही तोपर्यंत नजीकच्या शाळांमधील एका शिक्षकाची नेमणूक करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही. जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया शासन दरबारी जाहीर होण्याची चिन्हे आहेत. शासनाने शिक्षक भरती जाहीर केली तर रायगड जिल्ह्याला रिक्त पदांच्या तुलनेत 80 टक्के शिक्षक नवीन मिळणार आहेत.
पुनिता गुरव
शिक्षणाधिकारी प्राथमिक
रायगड जिल्हा परिषद