| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नवगाव हे माझे आवडते गाव आहे. ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवणे ही माझी भूमिका आहे, अशा शब्दांत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी नवगावशी असलेले आपले भावनिक नाते व्यक्त केले. मंदिर, रस्ते किंवा अन्य विकासकामे असोत, ग्रामस्थांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. नवगाव येथील भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धार व उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, शेकापच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, कामगार आघाडीचे नेते प्रदीप नाईक, उद्योजिका व दानशूर व्यक्तिमत्त्व कविता सिंह, प्रमोद घासे, अरुण कवळे, सरपंच अंकिता जैतू, उपसरपंच तथा मंडळाचे उपाध्यक्ष निखिल कवळे, मंडळाचे अध्यक्ष मधुकर घासे, सचिव समीर राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे शिवज्योती मित्र व महिला मंडळाच्या पुढाकारातून भवानी माता मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जयंत पाटील यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी नवगावशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित केले.
यापुढे मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी नवगावच्या ग्रामस्थांची आपली कामे मार्गी लावून घेण्याची हातोटी वेगळीच असल्याचे सांगत ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन एखादे काम हाती घेतले, तर ते यशस्वीपणे पूर्ण करण्याची ताकद त्यांच्यात आहे, असेही त्यांनी नमूद केले. ग्रामस्थांच्या योगदानातून भव्य, दिव्य आणि सुसज्ज मंदिराची वास्तू उभी राहणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवज्योती मित्र व महिला मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींच्या योगदानाचे कौतुक केले. गावाच्या विकासासाठी तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.







