| मुंबई | प्रतिनिधी |
शिंदे गटातील शिवसेनेचे आ. प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गोरेगाव येथील वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून त्याला मारहाण करत सुर्वेंसह बारा जणांनी त्याचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
बुधवारी गोरेगाव पूर्व परिसरातून व्यापारी राजकुमार सिंह यांचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बंदुकीच्या धाकावर व्यापाऱ्याचे अपहरण केल्याचा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन कार्यालयात सुमारे 10 ते 15 जण घुसले. म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंह यांचे अपहरण केल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेचे एक सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये 10 ते 15 जण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत असल्याचं बोललं जातं. तर एका व्यक्तीला जबरदस्तीने सोबत नेतानाही दिसत आहे.
तक्रारदार राजकुमार सिंग यांच्या आरोपानुसार, त्यांना त्यांच्या कार्यालयातून जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं. पाटणा येथील मनोज मिश्रा यांना दिलेल्या व्यावसायिक कर्जाची सेटलमेंट करण्यासाठी त्यांच्यावर बंदुकीच्या जोरावर दबाव आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.