शिंदे गटाच्या पदाधिकार्‍याविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील वावंजा गावात महावितरण कंपनीच्या वाशी येथील भरारी पथकाने केलेल्या कारवाईत वीजचोरीचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. याबद्दल वीज विभागाचे सहाय्यक अभियंता कपिल गाठले यांनी बुधवारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार वावंजा गावातील परेश पाटील आणि त्यांच्या पत्नीने 30 हजारांपेक्षा जास्तीच्या वीज युनिटची चोरी केल्याची तक्रार पोलिसांना दिली. परेश पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे पनवेल ग्रामीणचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत.

वावंजा गावातील घर क्रमांक 1422 येथे पाटील दाम्पत्य राहात असून, ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2024 या दरम्यान 19 महिन्यांमध्ये 30,8223 वीज युनिटची चोरी केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आल्याने परेश पाटील व त्यांच्या पत्नीविरोधात 10 लाख 25 हजार 922 रुपयांची वीजचोरी केल्याबाबत भारतीय विद्युत कायदा कलम 2003 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता कपिल गाठले यांनी तक्रार दिल्यावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हा गुन्हा पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर यांनी दिली. परेश पाटील हे तत्कालिन पनवेल पंचायत समितीचे सदस्य होते. शेकाप व शिवसेनेच्या युतीमध्ये त्यांना जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली होती. सध्या ते शिंदे गटाच्या शिवसेनेचे ग्रामीण पनवेलचे पदाधिकारी आहेत. विशेष म्हणजे, वावंजा गावात यापूर्वीही वीजचोरी होत असतानासुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी पकडले आहे.

Exit mobile version