कार मागे घेण्यावरुन हाणामारी

परस्परांविरोधात गुन्हे दाखल

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मध्य रेल्वेचे मेन लाईन वरील फाटक ओलांडत असताना चिंचवली गावातील एका अरुंद रस्त्यावर कार मागे घेण्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन दोन्ही गटामध्ये वाद निर्माण झाला. त्या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चांदइ गावातील तक्रारदार आणि त्यांची पत्नी कारने भिवपुरी रेल्वे स्टेशनहून चांदईकडे जात होते, तर समोरून आरोपी त्यांच्या कारने येत होते. चिंचवली गावाजवळील अरुंद रस्त्यावर दोन्ही कार समोरासमोर आल्याने कोण गाडी मागे घेणार, या मुद्द्यावरून वाद झाला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, गाडी मागे घेण्यास सांगितल्यामुळे आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केली, धमकी दिली व आपल्या साथीदारांना फोनवर बोलावले. त्यानंतर गाडीवर फाईट मारण्यात आला आणि साक्षीदार महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचवेळी चिंचवली येथील दुसऱ्या फिर्यादीकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार त्या तरुणाने कारमधून उतरून फिर्यादीला पकडले आणि चावीला लावलेल्या छोट्या चाकूने छातीवर वार करून गंभीर दुखापत केली. फिर्यादींच्या आईने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर लैंगिक हेतूने हात लावून ढकलण्यात आले. यासंदर्भात नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि नेरळ पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक करीत आहेत. या प्रकरणामुळे चिंचवली गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Exit mobile version