| उरण | वार्ताहर |
मागील 83 वर्षांची सलग पाच दिवस उत्सव साजरा करण्याची परंपरा जपणार्या शिवकृपा मंडळाच्या शिव कृपा गौरा उत्सवाला प्रारंभ झाला आहे. उरण तालुक्यातील खोपटा येथील शिव कृपा गौरा उत्सवाच्या पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, गोंधळ, महिला पुरूषांचे पारंपरिक नृत्य, आरोग्य शिबीर तसेच बाळ्या नाच यासारख्या मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. शुक्रवारी शिव कृपा गौरा मंडळाच्या वतीने आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामीण भागातील आबालवृद्धानी विशेष करून महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला होता.
उरण तालुक्यातील खोपटे पाटीलपाडा येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने 1941 साली शिवकृपा गौरा मंडळाची स्थापना केली. पूर्वी एका जुन्या घरात या शिव कुपा गौर्याची स्थापना केली जात होती. कालांतराने त्या घरमालकाने हे घर या शिवकृपा गौरा मंडळासाठी दिले. त्यानंतर त्याच ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिर उभारण्यात आले. तेव्हापासून या मंदिरात शिवकृपा गौर्याची प्रतिष्ठापना केली जात आहे. दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने हा सण गावकरी साजरा करत असून शिव कुपा गौरा मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत.
यावर्षी शिवकृपा गौरा मंडळाचे 83 वे वर्ष सुरू असून, मंडळाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे गुणगौरव, चित्रकला स्पर्धेचे आयोजन तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असे सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती मंडळाचे सचिव अॅड. सत्यवान भगत यांनी दिली.