लोकलच्या धडकेत चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू

| उरण | वार्ताहर |

नेरुळ उरण रेल्वे मार्गावर फिरण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलीला भरधाव लोकलची धडक लागल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.24) रात्री बामणडोंगरी रेल्वे स्टेशन जवळ घडली आहे. या अपघातात मृत मुलीच्या 17 वर्षीय मित्राचा देखील हात फ्रॅक्चर झाला आहे. एनआरआय पोलिसांनी या घटनेनंतर मृत मुलीच्या जखमी मित्रावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील 14 वर्षीय मृत मुलगी व 17 वर्षीय तिचा मित्र हे दोघेही उलवेतील एकाच सेक्टरमध्ये राहण्यास आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये काही दिवसापुर्वीच मैत्री झाली होती. शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हे दोघे भेटल्यानंतर ते दोघे बामणडोंगरी रेल्वे स्थानकाजवळून नेरुळ उरण रेल्वे रुळावर गेले होते. यावेळी दोघेही रेल्वे रुळालगत अंधारात बराचवेळ गप्पा मारत बसले होते. यावेळी त्यांना उरण येथून नेरूळ च्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा अंदाज आला नाही. यावेळी लोकलच्या मोटरमनने हॉर्न वाजवल्यानंतर तरुणाने बाजुला उडी मारली. मात्र मुलीला उठता न आल्याने तिच्या डोक्याला लोकलचा फटका बसल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणाने या घटनेची माहिती मृत मुलीच्या नातेवाईकांना अथवा इतर कुणाला न देता त्याठिकाणावरुन जखमी अवस्थेत पलायन केले. हा प्रकार उलवे भागातील काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एनआरआय पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, त्यांना रेल्वे रुळालगत मुलीचा मृतदेह आढळुन आला. पोलिसांनी सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवून दिला. त्यानंतर पोलिसांनी मृत मुलीसोबत असलेल्या तरुणाकडे अधीक चौकशी केल्यानंतर दोघेही रेल्वे रुळालगत फिरण्यासाठी गेले असताना, मुलीला लोकलची धडक लागल्याचे त्याने सांगितले. या दुर्घटनेत तरुणाचा हात देखील फ्रॅक्चर झाल्याचे आढळुन आले आहे. दरम्यान नेरुळ उरण रेल्वे रुळावर लोकलची वाहतून सुरु असल्याने त्यावर जाणे धोकादायक आहे, याची माहिती असताना, सुद्धा या घटनेतील तरुणाने आपल्या 14 वर्षीय मैत्रीणीला अंधारात बामणडोंगरी रेल्वे रुळावर नेल्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी या घटनेला जबाबदार धरुन त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version