चार वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार, एक जखमी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलजवळील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेन कि.मी.08/900 या हद्दीत सोमवारी पहाटे स्कुटी मोटारसायकल, कार, आयसर टेम्पो व ट्रक यांच्या झालेल्या विचित्र अपघातात एक ठार आणि एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

स्कुटी मोटारसायकल क्र.एमएच-46-बीएक्स-4482 वरील चालक आनंद विरकर (42), रा. कामोठे हे मुंबई-पुणे महामार्गावर मुंबई बाजूकडे नो एन्ट्रीमध्ये तिसर्‍या लेनने स्कुटी मोटारसायकल चालवित घेऊन जात होते. दरम्यान, कि.मी.08/900 या ठिकाणी आल्यावेळी त्यांनी त्यांच्या ताब्यातील गाडी अचानक दुसर्‍या लेनवर घेतल्याने त्यांच्या पाठीमागून चालणारी कार क्र.एमएच-12-टीके-9302 वरील चालक रिझवान खान (25) रा.पुणे याने ताब्यातील वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर चालवित जात असलेल्या स्कुटी गाडीला जोरदार धडक दिली. यावेळी स्कुटी चालक आनंद विरकर हा पहिल्या लेनमध्ये पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो मृत्यू झाला आहे. याचवेळी अपघातग्रस्त कार दुसर्‍या लेनवर उभी असल्याने पाठीमागून येणारा आयसर टेम्पो क्र.एमएच-12-व्हीएफ-0158 वरील चालक धीरज प्रजापती (24 )रा.पुणे याने त्याच्या वाहनाचा वेग कमी केल्याने त्याच्या पाठीमागून येणारा ट्रक क्र. टीएन-57-सीवाय-8436 वरील चालक दिना कारण (25) रा. तामिळनाडू याला आपला ट्रक नियंत्रित न झाल्याने पुढे असलेल्या आयसर टेम्पोला पाठीमागून जोरात ठोकर मारल्याने आयसर टेम्पो उजव्या बाजूला पहिल्या लेनच्या रेलिंगला जोरात आपटली. त्यामुळे आयसरचे पुढील केबिन दाबल्याने आयसरवरील चालकाचा पाय अडकला व यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच आयरआरबी, फायर ब्रिगेड, वाहतूक शाखेचे पोलीस, पनवेल तालुका पोलिसांचे पथक, आयआरबी स्टाफ, पळस्पे मोबाईलवरील अंमलदार व पथक आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version