। तळा । वार्ताहर ।
तळा येथील जी.एम. वेदक महाविद्यालयातील वार्षिक क्रीडा स्पर्धेचा शानदार शुभारंभ बुधवारी (दि.22) महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर क्रिकेट स्पर्धेने करण्यात आला. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.22 ते दि.25 जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे. त्यात क्रिकेट, खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धीबळ, कॅरम, दोरी ओढणे व धावणे यासारख्या स्पर्धा असून दि.27 ते 30 जानेवारी दरम्यान सांस्कृतिक स्पर्धा, रांगोळी, पोस्टर, मेहंदी, पाककृती, अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, फिशपॉण्ड सारख्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तर, दि.31 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन असून यासाठी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते आशीर्वाद मराठे उपस्थित राहणार आहेत. हे सर्व कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वेदक आणि सचिव उन्मेष वेदक यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. प्राचार्या डॉ. शाहीना मिर्झा, क्रीडा विभाग प्रमुख निकम, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी.बी. अभंगे, विद्यार्थी प्रतिनिधी राजू शेलार यांच्या नियोजनातून सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने होणार आहेत.