सर्वाधिक चेंडू राखून इंग्लंडवर मात
। कोलकाता । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट संघाने बुधावारी (दि.22) इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 7 गडी राखत विजय मिळवत विश्वविक्रमाची नोंद केली आहे. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने वादळी अर्धशतक केले. तसेच, टी-20 सामन्यात सर्वाधिक चेंडू राखून इंग्लंडवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. भारतीय गोलंदाजांच्या अतुलनीय नियोजनाचा आणि फलंदाजांच्या स्फोटक खेळीने भारताने हा विजय मिळवला असून ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रमही मोडीत काढला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 20 षटकांत 132 धावांवर रोखले. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 44 चेंडूत 68 धावा केल्या. त्याशिवाय इंग्लंडचे अन्य फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाही.
भारताने इंग्लंडने दिलेल्या 133 धावांचे लक्ष्य 12.5 षटकांत पार केले. भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरूवात केली. संजू सॅमनसन 26 धावांवर बाद झाला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवही शून्यावर बाद झाला. त्यांनतर अभिषेक शर्माने आक्रमक खेळी करत 79 धावांवर बाद झाला. तेव्हा भारताचा विजय केवळ औपचारिकता राहिली होती. 13 व्या षटकात तिलक वर्माने चौकार ठोकत भारताचा विजय निश्चित केला. तिलक 19 धावांवर नाबाद राहिला हार्दिक पांड्या 3 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 2 बळी घेतले, तर आदील राशीदने 1 बळी घेतला. आणि इंग्लंडविरुद्ध टी-20 आयमध्ये 130 पेक्षा जास्त धावसंख्येच्या कोणत्याही संघाने केलेला हा सर्वात जलद पाठलाग ठरला. यापूर्वी हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, ज्यांनी 7 वर्षांपूर्वी मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या टी-20 आयमध्ये इंग्लंडविरुद्ध 14.5 षटकांत 130 प्लस धावांचा पाठलाग केला होता.
अभिषेक शर्माची वादळी खेळी
भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, त्यांची 41 धावांची भागीदारी झालेली असताना संजू सॅमसनला जोफ्रा आर्चरने 5 व्या षटकात 26 धावांवर बाद केले. याच षटकात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवही शून्यावर बाद झाला. मात्र, त्यानंतर आक्रमक खेळणार्या अभिषेकला तिलक वर्माने चांगली साथ दिली. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली. यादरम्यान अभिषेकने 20 चेंडूतच अर्धशतकही केले. त्याने इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजावर हल्लाबोल केला होता. अखेर 12 व्या षटकात आदिल राशीदने त्याला बाद केले.
5 चौकार । 8 षटकार । 34 चेंडूत 79 धावा
सलग सातवा विजय
भारताचा हा ईडन गार्डनवरील सलग सातवा टी-20 विजय ठरला आणि एकाच मैदानावर सलग टी-20 सामने जिंकण्याच्या पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानने कराची येथे 2008-21 या कालावधीत सलग 7 टी-20 सामने जिंकले आहेत. या विक्रमात इंग्लंड 8 (कार्डिफ) विजयांसह अव्वल स्थानी आहे.