। मुंबई । प्रतिनिधी ।
अमरहिंद मंडळ अयोजीत महिला व किशोर गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन दादर येथील अमरहिंद मंडळाच्या पटांगणावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत उद्घाटनीय सामन्यात महिला गटांत डॉ. शिरोडकर स्पोर्ट्सकडून विजयी प्रांरभ करण्यात आला होता. तर, किशोर गटाच्या उद्घाटनीय सामन्यात वीर नेताजी, संस्कृती प्रतिष्ठान, व रणझुंझार मंडळाने विजयी सलामी दिली होती. दरम्यान, शिवनेरी सेवा, नवोदित संघ, जय भारत, यंग प्रभादेवी यांनी किशोर गटात दुसरी फेरी गाठली आहे.

किशोर गटात शिवनेरीने 5-5 चढायांत काळाचौकीच्या अमर मंडळाला 52-51 (6-5) असे पराभूत केले. काळजाचा ठोका चुकविणार्या या सामन्यात अखेर शिवनेरी एका गुणाने बाजी मारली. पूर्वार्धात 22-22 अशी, तर पूर्ण डावात 46-46 अशी बरोबरी होती. दुसर्या सामन्यात नवोदित संघाने चुरशीच्या लढतीत गौरीदत्त मित्तल संघाला 48-46 असे नमवित आगेकूच केली. विश्रांतीला 33-17 अशी आघाडी घेणार्या नवोदितला नंतर मात्र विजयाकरिता गौरीदत्त मित्तलने शर्थीची लढत दिली. तिसर्या सामन्यात जय भारतने श्रेयस मटकर, अर्णव बावडेकर यांच्या झंझावाती खेळामुळे दुर्गामाता स्पोर्ट्सवर 67-44 असा विजय मिळविला.
महिलांच्या सामन्यात जिजामाता महिला संघाने श्री स्वामी समर्थ मंडळावर 36-17 अशी मात केली. आक्रमक सुरुवात करीत पहिल्या डावात 26-09 अशी आघाडी घेणार्या जिजामाताने नंतर सावध खेळ करीत सामना आपल्या बाजूने केला. प्रीती हांडे, कृतिका चव्हाण यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. स्वामी समर्थची साक्षी जंगम बरी खेळली.
इतर निकाल संक्षिप्त किशोर गट:-
1) वारसलेन विरूद्ध शताब्दी 45-25
2) गोलफादेवी विरूद्ध गुड मॉर्निंग 61-48
3) यश मंडळ विरूद्ध वीर संताजी 53-14
4) बाल उत्कर्ष विरूद्ध विजय क्लब 59-12