। क्वालालंपूर । वृत्तसंस्था ।
भारतीय मुलींनी 19 वर्षांखालील ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तिसर्या विजयाची नोंद करताना 6 मधील जागा निश्चित केली आहे. भारतीय पोरींनी वेस्ट इंडिजविरुद्ध 26 चेंडूंत, तर मलेशियाविरुद्ध 17 चेंडूत विजय मिळवला होता. गुरूवारी भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 118 धावा केल्या आणि त्यानंतर श्रीलंकेला गुंडाळून आणखी एक दणदणीत विजय मिळवला आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झालेली नाही. त्रिशा गोंगडीने एका बाजूने चांगली फलंदाजी केली. कमालिनी जी (5), सानिका चाळले (0), भाविका अहिरे (7), आयुशी शुक्ला (5) या एकेरी धावसंख्येवर बाद झाल्या. सलामीवीर त्रिशाने 44 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. कर्णधार निकि प्रसाद (11), मिथिला विनोद (16) व जोशिथा व्ही जे (14) यांनी हातभार लावला. भारताला 9 बाद 118 धावापर्यंत पोहोचता आले. भारताच्या गोलंदाजांनीही उत्तम मारा केला. शबमन व जोशिथा यांनी सुरुवातीलाच श्रीलंकेच्या संघाला धक्के दिले. 12 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता आणि त्यात शबमन व जोशिथा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले होते. श्रीलंकेला 9 बाद 58 धावाच करता आल्या आणि भारताने हा सामना 60 धावांनी जिंकला आणि पहिल्या गटात अंतिम सहामध्ये भारताने स्थान पक्के केले आहे.