। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा कसोटीतील उपकर्णधार जसप्रीत बुमराहसाठी गेले काही महिने शानदार राहिले आहेत. त्याला काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या शानदार कामगिरीमुळे डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आयसीसीचा पुरस्कार मिळाला होता. आता त्याला आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे. बुमराहचे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील वर्चस्व कायम राहिले आहे.
आयसीसीने बुधवारी (दि.22) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार बुमराह कसोटीमधील गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर कायम राहिला आहे. तो 908 रेटिंग पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे. कोणत्याही भारतीय गोलंदाजाला कसोटीत मिळालेले हे सर्वोत्तम रेटिंग आहे. त्याच्यापाठोपाठ पॅट कमिन्स (841), कागिसो रबाडा (837), जोश हेजलवूड (835) आणि मार्को यान्सिन (785) आहेत. रवींद्र जडेजा 10 व्या क्रमांकावर घसरला आहे. दरम्यान, पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये बुमराह आणि जडेजा हे दोनच भारतीय आहेत.