…आक्रोश अन्‌‍ हंबरडा

| अलिबाग | माधवी सावंत |

माझा कुनिच नाई राईला गं,
एव्हरं संकटं कदी आले नाई गं!
माझे आयबापाचे हातपाय दिसं ना,
चुडा मोडून माझा सखा कुठं गेला रं!
एकली मी कसी राऊ गं,
आसरा कुनाचा बी नाई गं!


हुंदक्यासह या ओळी ऐकूनच मन सुन्न झालं. दिवसभराचं काम करुन थकलेलं शरिर विसाव्यालां आलं आणि झोपेतच ती रात्र काळरात्र ठरली. सकाळ झाली ती महिलांचा हंबरडा…आक्रोश, पावसाच्या जोरदार सरींसोबत न लपवता येणारं डोळ्यातलं पाणी आणि माझा माणूस कुठेय हे शोधण्यानेच. गेली जवळपास दिडशे वर्षे ज्या धरणीच्या कुशीत सुख-दुःख सोसलं. त्या धरणीनंच आधार काढून घेतला. आभाळाचं छत फाटलं. इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या त्या गावाचं क्षणात होत्याचं नव्हतं झालं.



काही वेळातच अचानक माणसांच्या किंकाळ्या, क्षणांत आवाज विरलेले, कालांतराने तर केवळ पाण्याचा अन्‌‍ पावसाचाच आवाज येत होता. गेल्या जवळपास 50 वर्षात असं रौद्ररुप कधी बघितलं नसल्याचं सांगताना त्यांना येणारा हुंदका काळीच चिरणारा होता. चिमुकल्यांचे तर हाल झाले होते. ना आईची सावली ना बापाचा आधार, अशी त्यांची अवस्था पाहून प्रत्येकाचेच डोळे पाणावले होते. आता काय करायचं ? कुठे जायचं हे त्यांना कळत नव्हतं.



एक नाही दोन नाही तर तब्बल 150 पेक्षा जास्त नागरिक या ढिगाऱ्यात अडकल्याची शक्यता वर्तविली जात होती. आपल्या कुटूंबातील कोण कुठेय, हे कुणालाही कळत नव्हतं. एखादा मृतदेह सापडलाच तर ओळख पटविण्यासाठी त्यांना नेताना त्या प्रत्येक महिलेला सांभाळणं कुणालाही शक्य नव्हतं. काळजावर दगड ठेऊन रेस्क्यू टीमवाले हे सारं काही करत होते. त्यांच्या या परिश्रमाला खरंच सलाम करावा, असंच त्यांचं कार्य होतं. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींचा ताफा गर्दी करुन होता. मुख्यमंत्री जवळपास दोन तास उदय सामंत, दादा भूसे यांच्यासह प्रशासनासोबत चर्चा करीत होते. लोकप्रतिनिधींच्या वाहनांनी आणि त्यांना पाहण्यासाठी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी अडथळा ठरत होता. सारं काही प्रसिद्धिसाठी अशी कुजबूज विचार करायला लावणारी होती. अशातच रेस्क्यू टीमच्या सहकाऱ्यांनी हेलिकाप्टरची मागणी केली होती. कारण जखमींना झोळीत टाकून नाहीतर खांद्यावर उचलून ते तीन तास डोंगरावर चढ-उतार करीत होते. मात्र दोन तास त्यांच्यावर केवळ चर्चाच सुरु होती. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे.

महिला पोलिसही भावूक


या घटनेनंतर लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. परिणामी सुरक्षेच्या दृष्टिने रायगड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली होती. यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. महिला पोलीस स्थानिक महिलांना आधार देण्याचं काम करीत होत्या. महिलांचा तो हुंदका ऐकून महिला पोलिसांचे डोळेही पाणावले होते. एरव्ही कणखर भूमिका बजावणारी महिला पोलीस कर्मचारी त्या महिलांना मायेनं जवळ घेत होत्या. हे पाहून अनेकांच्या मनातील पोलिसांची भीती कायमची दूर झाल्याचं दिसून आलं.

आठ गाव हायेत पन लक्ष कुनी देईना- गुलाब हिलम
70 वर्षात पहिल्यांदाच अशी घटना घडली. काईजण करतात आमच्यासाटी पण तरीबी इथं आजमितिस दवाखाना जाला नाही. आमच्याकडं डाक्टरच नाई. आजारी पडलं कि, चौकला गेल्याबिगर पर्याय नाई. रातच्याला समजलं ठाकूर वाडीत असं घडलं. इतकं वर्ष आम्ही एकसात राहिलो. आंबे, जांबूळ घ्यायला ठाकूर वाडीत गेलो तर जेवल्याबिगर आम्हाला पाठवत नसं. ते आम्हाला सोडून गेलं, हे लय वाईट झालं.


आदीवासींकडे दुर्लक्ष होतंय- मंगल शरद वागे
अनेकदा मागणी करुनही आमच्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलं जातं. गेली कित्येक वर्ष दवाखाना व्हावा, यासाठी सर्वांना सांगितलं. मात्र कुणीही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मतदानाच्यावेळी अनेकजण येतात. मतदान झालं कि परत जैसे थे अशीच परिस्थितीत असते.

Exit mobile version