शिवरायांचे गड किल्ले अतिक्रमण मुक्त करणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| महाड | उदय सावंत |
दुर्गराज रायगडावर सोमवारी (दि.9) तिथीनुसार हजारो शिवभक्तांच्या उपस्थित शिवराज्याभिषेक शिवमंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. रविवारपासूनच किल्ले रायगडावर शिवभक्तांची मांदियाळी जमण्यास सुरुवात झाली होती. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
सोमवारी सकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज समाधी पूजन, जगदीश्वर मंदिरातील शिवपूजन व होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून शिरकाई देवीचे पूजन करून 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी रायगडावर होळीचा माळ, राज सदर या ठिकाणी मर्दानी खेळ, पोवाडे, सादर करण्यात आले. किल्ले रायगड मशाली व दिव्यांनी उजळून निघाला होता. तसेच, इलेक्ट्रिक लाईटच्या रंगीबिरंगी प्रकाशात गडावरील पुरातन इमारतींचे सौंदर्य खुलून निघाले होते. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, औद्योगिक मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे, खासदार बारणे, आमदार मंगेश चव्हाण, रुपेश म्हात्रे, जिल्हाधिकारी किशन जाळवे यांच्यासह हिरोजी इंदुलकर, बांदल व जेधेंचे वंशज आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवरायांना अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे मराठीच्या अस्मितेचा हुंकार असल्याचे सांगितले. इस्लामिक लाटेसमोर यादवांचे साम्राज्य संपले; मात्र, शिवरायांच्या या राज्याभिषेकाने भारतात एकमेव हिंदू राज्य निर्माण झाले. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या दर्शनासाठी भारत गौरव यात्रा सुरू केली आहे. ही ट्रेन सोमवारी माणगाव येथे आली असून पर्यटकांना किल्ले रायगडचे दर्शन घडवीणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे अतिक्रमण मुक्त करण्याचे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांचे असून महाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीला भरीव तरतूद केली जाईल, असे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.