चेस असोसिएशनची स्थापना; अध्यक्षपदी प्रमोद म्हसकर यांची निवड
| चणेरा | प्रतिनिधी |
जागतिक बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधत रोहा तालुक्यात बुद्धिबळ खेळाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. बुद्धिबळाचा ग्रामीण भागात प्रसार, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन, दर्जेदार प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोहा तालुका चेस असोसिएशन (आरटीसीए) ची स्थापना करण्यात आली. या नव्या संघटनेच्या अध्यक्षपदी सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात सक्रिय असलेले प्रमोद म्हसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या नव्या कार्यकारिणीत संकेत खोत यांची कार्याध्यक्ष, अमर सलागरे यांची उपाध्यक्ष, विक्रांत जाना यांची सचिव, विवेक कांबळे यांची सहसचिव, महेश बामुगडे यांची खजिनदार, तर योगेश भगत यांची सहखजिनदार म्हणून निवड करण्यात आली. तसेच, कार्यकारिणी सदस्य म्हणून आभूषण मिठागरी, विवेक कानडे, ओमकार पवार, अनिकेत पाशिलकर, प्रशांत देशमुख, सुधीर जंगम, रविंद्र कान्हेकर आणि रोहन चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. रोहा तालुक्यातील बाल व युवा बुद्धिबळपटूंना नियमित प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक तयारी मिळावी यासाठी पी. एम. चेस अकॅडमी सुरू करण्यात येणार आहे. म्हसकर यांच्या पुढाकारातून साकार होणाऱ्या या अकॅडमीमधून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत बुद्धिबळपटू घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद म्हसकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुरस्कारातून दि. 9 ऑगस्ट रोजी रोहा येथे भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमारे 200 खेळाडूंना सहभागी होण्याची संधी मिळणार असून, खुल्या गटासाठी 100 रुपये नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 16 वर्षांखालील सर्व खेळाडूंना प्रवेश पूर्णपणे मोफत देण्यात आला असून, युवा बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देण्याचा हा महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने विधायक उपक्रम राबविणारे म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुका चेस असोसिएशन बुद्धिबळाची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचा निर्धार नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. जागतिक बुद्धिबळ दिनी झालेली असोसिएशनची स्थापना, 9 ऑगस्टला होणारी भव्य स्पर्धा आणि पी. एम. चेस अकॅडमीची घोषणा यामुळे रोहा तालुक्यात बुद्धिबळ खेळाला नवी ऊर्जा, नवे व्यासपीठ आणि उज्ज्वल भविष्य मिळणार असल्याची माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष अमर सलागरे यांनी दिली.
