मुलाखतीतून उलगडला निपुण भारतचा अविष्कार
| पाली/बेणस | प्रतिनिधी |
समूह साधन केंद्र काळुंद्रे केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच चिखले शाळेत संपन्न झाली. या परिषदेत निपुण भारत अभियान अध्ययन अभ्यास सर्वेक्षण अंतर्गत सुसंवाद घडून आणला. यावेळी विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला आकार देणार्या सर्वंकष सातत्यपूर्ण मुल्यमापनातील मुलाखत या तंत्राचे दर्जेदार सादरीकरण करण्यात आले. केंद्रप्रमुख गीते यांनी मार्गदर्शन करून विविध संकल्पना स्पष्ट केल्या.
यावेळी अध्ययन निष्पत्ती व अध्यापनाची दिशा यावर चित्ररेखा जाधव, विनोद तुपलोंढे व वनिता गावंड यांनी सादरीकरण केले. दरम्यान आशा पाटील यांनी ‘मुलांच्या मनात दडलंय काय’ या पुस्तकाचे सहज सुंदर परीक्षण व परिचय केला. शिक्षण प्रक्रियेतील मुल समजून घेणे या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व असल्याने याची यातून समज तयार झाली.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतील सृजनशीलतेला आकार देणार्या विविध क्लबच्या माध्यमातून केंद्रातील सर्व शाळांमध्ये सुप्त गुण असणार्या विद्यार्थ्यांना एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे 21 व्या शतकातील कौशल्यांकडे विद्यार्थ्यांना प्रवास सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.
शिक्षणाच्या नव्या प्रवाहाप्रमाणे अध्ययन निष्पत्तीवर अधिक लक्ष केंदित केल्याने अध्यापनाला योग्य दिशा मिळते ही भूमिका केंद्रप्रमुख गीते यांनी कायमच ठेवली आहे. केंद्रप्रमुख गीते यांनी यापूर्वी देखील पनवेल तालुक्यात पहिल्या ज्ञानरचनावादी केंद्राची निर्मिती करून त्या पद्धतीने अध्यापनाची दिशा दिली होती. त्यांचा प्रादेशिक विद्या प्राधिकरणातील विभागीय अनुभव व अनेक राज्यस्तरीय प्रशिक्षणात सुलभक म्हणून केलेलं काम यामुळे ते जिल्ह्यात कायमच उपक्रमशील केंद्रप्रमुख म्हणून ओळखले जातात. या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन स्मिता जाधव, रोहिणी गायकवाड व स्नेहा दळवी यांनी केले. विठ्ठल गायकवाड यांनी अहवाल वाचन केले तर भास्कर पाटील यांनी आभार मानले.
मुलाखत तंत्र
काळुंद्रे क्रिएटिव्ह कट्ट्यावर मेघा गुडे व पूर्वा भायपाटील यांनी मुलाखत सदर केली. पूर्वा भायपाटील यांच्या व शिक्षकांच्या मनातील अनेक प्रश्नांना मेघा गुडे यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वाना निपुण भारत अभियानाची दिशा व सफलता स्पष्ट झाली. मुलाखतीचे संचालन निशा म्हात्रे यांनी केले.
विद्यार्थ्यांची कोटीची उड्डाणे
केंद्रातील इयत्ता 1 ली च्या उसर्ली शाळेतील विद्यार्थ्यांची गणित विषयातील उपलब्धी म्हणजे कोटी पर्यंतच्या संख्या वाचतात. केंद्रातील सर्वच शाळांमध्ये अभिव्यक्तीसाठी विद्यार्थी अग्रेसर झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शाळा पूर्व तयारीच्या मध्यामातून माता पालक गट सक्षम झाले असून त्या माध्यमातून देखील पहिल्या वर्गातील हे चिमुकले लक्ष वेधून घेतात.
शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाला व सक्षमीकरणाला कायम प्राधान्य दिल्याने आज शिक्षक सकारात्मक व उत्तम सुलभक झाले आहेत.
निंबाजी गीते
केंद्रप्रमुख, काळुंद्रे
शिक्षकांना विविध माध्यमातून प्रेरणा देऊन गुणवत्ता वाढविण्यासाठी केंद्रप्रमुखाचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. परिषदेत सादर झालेली मुलाखत म्हणजे शिक्षकांच्या प्रतिभेला उंची देणारी आहे.
सीताराम मोहिते
गट शिक्षणाधिकारी