| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईमधील बेलापूर येथील दिवाळे खाडीच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच पडला आहे. यापूर्वी दोन-तीन वेळा खाडी किनाऱ्यालगत मृत माशांचा खच पडला होता. त्यामुळे मासेमारीवर उपजीविका असलेले कोळी बांधव चिंतीत झाले आहेत.
खाडीतील प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. माशांच्या अंडी देण्याच्या ठिकाणी चिखल आणि रासायनिक कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे संवेदनशील असलेले मासे तेथे अंडी घालत नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून खाडीत आढळून येणाऱ्या अनेक मत्स्य प्रजाती कायमस्वरुपी नष्ट होण्याची भिती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली. जिताडा, खेकडा, कोळंबी आदी माशांचाही त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे जाळ्यात अडकलेले मासेही मृत अवस्थेत होते. असे मासे आरोग्याच्या दृष्टीने खाण्यास अयोग्य असल्याने विकता येत नाहीत. दरम्यान, हा प्रकार गेले अनेक महिने सुरू आहे. याबाबत तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रात्री-अपरात्री कारखान्यांमधून रासायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता थेट खाडीत सोडण्यात येते. त्यामुळे खाडीतील जैवविविधता धोक्यात येवू लागली आहे. मात्र, या प्रश्नाकडे प्रशासन फारसे गंभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी दिवाळे खाडी किनाऱ्यावर मृत मशांचा खच पडल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे यामध्ये वरख माशांचा देखील समावेश आहे. हा मासा काटेरी असल्यामुळे तो प्रामुख्याने मच्छीमार पकडत नहीत. याचबरोबर या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रदूषित पाण्यातही हा मासा तग धरु शकतो. मात्र, हे मासे मृतावस्थेत आढळल्यामुळे दिवाळे खाडीतील प्रदूषित पाण्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.