मतांसाठी घडाळ्याकडून पैशाचा पाऊस; मतदार महिलांनी केला गौप्यस्फोट

निवडणूक आयोग दखल घेऊन कारवाई करणार का?

। रोहा । प्रतिनिधी ।

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहिता राबविण्यात येत आहे. परंतु रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी खुलेआम पैसे वाटप केल्याचा आरोप खुद्द मतदारांनीच केला आहे. घड्याळावर बटन दाबा, 500 रुपये देऊ, असे सांगत मतदारांना मतदानाच्यादिवशी अमिष दाखविण्यात आले. तसेच मतदान केल्यानंतर पैसे देताना मात्र कार्यकर्त्यांनी याचे-त्याचे नाव सांगत मतदारांचे पैसे स्वतःच्याच खिशात टाकले असल्याचा आरोप सुडकोली येथील महिला मतदारांनी केला आहे.

आदर्श आचारसंहिता केवळ कागदावर ठेवून बसलेले निवडणूक आयोग या पैसे वाटपाची दखल घेऊन सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तसेच उपलब्ध छायाचित्रे व एकूण मतदान केंद्रे यांची संख्या लक्षात घेता सदर वाटप सुमारे 40 कोटी रुपयांचे असल्याने ईडी, सीबीआय तसेच सीआयडी, राज्य आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून राज्याचे गृहमंत्री चौकशी करण्याचे आदेश देणार का? असा सवालही मतदारांनी विचारला आहे.

जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोग निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवित असल्याचे सांगितले जाते. गाड्या तपासणी करण्यासाठी चेकनाके उभारले जातात. तरी देखील रायगड जिल्ह्यात अंदाजे 400 कोटी रुपयांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याकडून करण्यात आल्याचे उपलब्ध पुरावे पाहता दिसून येत आहे. चणेरा विभागातील दोन विधवा महिलांना घड्याळ या चिन्हावर मतदान केल्यास 500 रुपये देण्यात येतील, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र स्थानिक पुढार्‍यांनी यात मलिदा खाल्ला व सदर महिलांना पैसे न देताच चुना लावला. पॅकिंगमध्ये पेण विधानसभा मतदारसंघात पैशाचे वाटप करण्यात आले असल्याची उपलब्ध छायाचित्रे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी या निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी सुमारे 40 कोटी तसेच बुथवर कार्यरत कार्यकर्त्यांसाठी 25 ते 50 हजार प्रति बूथ वाटप केल्याचे सांगण्यात येत आहे.

यामुळे या निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी झालेल्या वाटपाचा आकडा 500 कोटींच्या घरात जात असल्याने स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा नारा देणारे निवडणूक आयोग व राज्याचे गृहमंत्री यांनी सदर प्रकरणाची ईडी ,सीबीआय, सीआयडी,र ाज्य आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या मार्फत चौकशी करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत.

पैसे वाटपाचा फॉर्म्युला
पैसे वाटप करणार्‍या पक्षाकडून एकूण मतदारांच्या 65 टक्के व 75 टक्के पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. या मतदारांना उमेदवारांकडून प्रत्येकी 500 रु. देण्यात आले. एकूण मतदार - 16,68,372, 65 टक्के मतदार 10,84,000, वाटप करण्यात आलेले मतदार ः 8,13,000, याप्रमाणे स्थानिकांना 40,65,00000 रुपयांचे वाटप करण्यात आले.

सोशल मिडीयावरील व्हीडीओची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.

नेहा उबाळे,
उपजिल्हाधिकारी,
निवडणूक

या व्हिडीओवरून कारवाई होऊ शकत नाही. सध्या याबाबत तक्रार प्राप्त नाही. तक्रार आल्यास पडताळणी करून कार्यवाही केली जाईल.

सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक,
रायगड
Exit mobile version