एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
। नागोठणे । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणार्या अपघातांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. चार दिवसांपूर्वीच पाटणसई ग्रामपंचायत हद्दीत मोटार सायकलला अपघात होवून यात एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.16) याच हद्दीतील चिकणी गावाच्या प्रवेशद्वारासमोर दोन टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक लागली. या भीषण अपघातात टाटाच्या छोट्या टेम्पोचे चालक प्रदीप नारायण कासुर्डे (रा.पिंपळगाव ता. मंडणगड) यांचा मृत्यू झाला; तर त्यांच्यासह प्रवास करणार्या हसीना इस्माईल खलफे (मु.पो.पिंपळोली, ता.मंडणगड) यांना गंभीर दुखापती होऊन त्या गंभीर दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनूसार, मुंबईकडून कोलाड बाजूकडे जाणारा टाटा कंपनीचा टाटा ऐस (छोटा हाती) यातील चालक प्रदीप नारायण कासुर्डे हे मंडणगडहून मुंबईकडे जात होते. यावेळी चिकणी गावाच्या प्रवेशद्वारासमोर आले असता समोरुन चुकीच्या मार्गाने येणार्या रोहा येथील गिरीश ट्रान्सपोर्टचा महिंद्रा कंपनीच्या टेम्पो चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून छोट्या टेम्पोला समोरुन जोरदार धडक दिली.
यावेळी छोट्या टेम्पोचे चालक प्रदीप कासुर्डे हे आतमध्येच अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच सहप्रवासी असलेल्या हसीना खलफे यांच्याही डोक्याला व हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिकांच्या मदतीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात त्यांना पाठविण्यात आले. मात्र गंभीर दुखापती झाल्याने अत्यवस्थ असलेल्या प्रदीप कासुर्डे यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक संजय चव्हाण व कर्मचारी तसेच ऐनघर महामार्ग पोलीस सपोनि गीतांजली जगताप आपल्या कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते.