मुद्रांक शुल्काच्या वाढीव किमतीची झाली अंमलबजावणी
। रायगड । प्रतिनिधी ।
दैनंदिन लागणार्या सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये सध्या मोठी वाढ झाली आहे. सरकारचे खाण्याच्या वस्तू, शिक्षण आणि आरोग्यासंदर्भातील उपचारांसह सर्वच गोष्टीच्या खर्चात दुप्पट वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच मंगळवारपासून 100 आणि 200 रुपयांच्या मुद्रांक शुल्कसाठी 500 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. दरम्यान, एकिकडे लाडक्या बहिणींना योजनेच्या माध्यमातून खैरात दिली आणि दुसरीकडे दिलेल्या रक्कमेच्या दुप्पट वसूली करीत असल्याने नागरिकांनी सरकारची लाज काढली आहे. महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेला राज्य सरकारने दिलेला धक्का चांगलाच बसला आहे.
खरेदी खत आणि हक्क सोडपत्रासाठी यापुढे आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. याआधी 100 आणि 200 रूपयांचे मुद्रांक शुल्क लागत होते. मात्र, हे बंद करून यापुढे आता 500 रुपयांच्या मुद्रांकावर सर्व व्यवहार करावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे. महाराष्ट्र मुद्रांकाच्या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यपालांनी सोमवारी (ता.14) अध्यादेश काढला होता. त्यानंतर त्याची अंमलबजावणी 16 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.
दरम्यान, महायुती सरकारने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1998 मध्ये सुधारणा करत आता प्रतिज्ञापत्रे, करारनामे आणि संबंधित कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क सध्याच्या 100 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील दुरुस्तीमुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणीमधून मिळणार्या राज्याच्या महसूलामध्ये जवळपास दोन हजार कोटी रुपयांची वाढ होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, खरं तर राज्य सरकारच्या महसूलाचा मुंद्राक शुल्क हा एक महत्वाचा स्त्रोत आहे. या अनुषंगानेच आता राज्य सरकारने मुद्रांक शुल्कांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेत मुद्रांक शुल्काच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. खरेदी खत, हक्क सोडपत्र, दस्त नोंदणी किंवा सदनिकांच्या विक्री व्यवहार नोंदणीसाठी आधी 100 रूपयांचे मुंद्राक शुल्क मोजावे लागत होते. मात्र, यासाठी यापुढे आता 500 रूपयांचे मुंद्राक शुल्क मोजावं लागणार आहे. यामध्ये नोटरी करणे किंवा बँकेमधून कर्ज घेण्यासाठी 100 रुपयांचे मुंद्राक शुल्क द्यावे लागायचे. पण आता याच मुंद्राक शुल्कसाठी 500 रूपये लागणार आहेत.