पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका 4 मजली इमारतीला आज (दि. 14) पहाटेच्या सुमारास अचानक भाषण आग लागली. या आगीत होरपळून चार जणांनी आपला जीव गमावला आहे.
शास्त्रीनगर परिसरातील गल्ली नंबर-13 येथील फ्लॅट नंबर 65 मध्ये आग लागली. ज्या इमारतीत आग लागली ती चार मजली असून तळमजल्यावर कार पार्किंग असल्याचे पोलिसांनी सांगितले. पार्किंगमधून आग लागली आणि संपूर्ण इमारतीत धूर पसरला. रस्ता अरुंद असूनही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्रत्येक मजल्याची तपसणी घेण्यात आली. तेथून तीन पुरुष, चार महिला आणि दोन मुलांना बाहेर काढून हेडगेवार रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
पण, या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मनोज (30), त्याची पत्नी सुमन (28) आणि एक ५ वर्षांची तर एका ३ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. या दोघी बहिणी असल्याची माहिती आहे.