| महाड | प्रतिनिधी |
विन्हेरे गावातील अशोक शिवदे दुकानातील कचरा टाकण्यास नागेश्वरी नदीत गेला असता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. त्याचा मृतदेह नागेश्वरी नदीच्या पात्रात आढळून आला. अशोक धाकू शिवदे यांचा ग्रामपंचायतीच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय आहे.
रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास दुकान बंद झाल्यानंतर दुकानातील कचरा नदीच्या पात्रात टाकण्यासाठी गेले होते. नदी पात्रात पाय घसरून पुराच्या पाण्यात ते वाहून गेले होते.नदीत कचरा टाकण्यात गेलेले शिवदे येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील तरुणांनी रात्रीच नदीपात्रात शोध मोहीम सुरु केली. परंतु मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शोध घेण्यात अडचणी येत होत्या.
तरुणांना रात्री शोध मोहीम अर्ध्यावर थांबवावी लागली. सोमवारी सकाळी नदीच्या पात्रात एका आदिवासी व्यक्तीला अशोक शिवदे यांचा मृतदेह पात्रातील उंबराच्या झाडाजवळ अडकलेल्या स्थितीत आढळून आला.
