। खेड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर लोटे औद्योगिक वसाहतीमधील वक्रतुंड हॉटेलसमोर बुधवार, दि. 10 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास डंपर व दुचाकीची धडक होऊन तरुणीचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर घटनास्थळी जमलेला जमाव संतप्त झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर लोटेमाळ येथील वक्रतुंड हॉटेलसमोर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास डंपर (एम.एच. 08 एपी 0826) व दुचाकीची धडक झाली. दुचाकी तजब उद्दीन परकार चालवत होता. डंपरखाली चिरडून दुचाकीवरस्वार रुक्सार असलम चौगुले ही तरूणी जागीच ठार झाली. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली. संतप्त जमाव पाहून डंपर चालक तेथून पसार झाला. अपघातस्थळी खेडच्या मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, तेजस मोरे, सिद्धेश शिर्के, विवेक बनकर व स्थानिक तरुणांनी मदत केली. डंपर चालकाचा शोध घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांसह ग्रामस्थदेखील घेत होते.