। मुरुड। वार्ताहर ।
मुरुड शहरातील पेठ मोहल्ला परिसरातून १२ वर्षाचा मुलगा तोहित लतीफ खलिफा हा वडापाव आण्यासाठी घराच्या बाहेर पडला तो घरात परत आलाच नाही. त्यामुळे सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्या मुलाची आई कैसरी खलिफा हिने मुरुड पोलीस ठाण्यात याबाबतची रीतसर तक्रार दाखल केली आहे.
मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतेवेळी मुलाच्या आईने माझ्या मुलास अज्ञात इसमाने पळून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अज्ञात इसमाविरुद्ध भ.द.वि कलम ३६३ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. १३ जून पासून हा मुलगा गायब असून त्याचा कसून शोध मुरुड पोलीस घेत आहेत. मुलाचा चेहरा उभट आहे.गहूवर्णीय आहे. त्याने गुलाबी रंगाचा टी शर्ट व चॉकलेटी रंगाच्या चपला परिधान केलेल्या आहेत. मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सागर रोहेकर हे तपास करीत आहेत. सदरचा मुलगा कोणाशी आढळून आल्यास पोलीस नाईक सागर रोहेकर भ्रमणध्वनी क्रमांक ९६०४९ २२२४५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुरुड पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आले आहे.