। अलिबाग । प्रतिनिधी ।
अपुर्या वाहन सुविधांमुळे डोंगरभागात राहणार्या मुली शिक्षणापासून वंचित राहत असल्याची समस्या कायमच भेडसावत आली आहे. मात्र एसटी महामंडळाची निळी परी डोंगरभागात दर्या खोर्यामध्ये राहणार्या मुलींच्या शिक्षणा उभारी देण्याचे काम करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मानव विकास योजनेअंतर्गत गाव ते शाळा, महाविद्यालयापर्यंत निळ्या रंगाच्या आठ एसटी बसेस सुरु केल्या आहेत. ही निळीपरी आदिवासी, मागास वर्गातील 360 मुलींच्या शिक्षणासाठी वरदान ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रायगड जिल्हा हा ग्रामीण जिल्हा म्हणून ओळखला जातो. रायगड जिल्ह्यात डोंगरभागात राहणार्या मागास वर्गातील व आदीवासी, ठाकूर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात कर्जत, खालापूर, पेण, रोहा, महाड या तालुक्यात संख्या अधिक आहे. दर्या खोर्यात वाहतूक सुविधा पोहचत नसल्याने आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणाला नेहमी आडकाठी आली आहे.
वाहतूक सुविधा नसल्याने वाड्या वस्त्यांमध्ये राहणार्या मुलींचे शिक्षण अर्धवट राहते. त्यांना शाळा, महाविद्यालयापर्यंत पुढील शिक्षण घेता येत नाही. अनेक वेळा मुलींचे लवकर लग्न लावले जाते. त्याचा परिणाम कुपोषित बालके होण्याची भिती आहे. त्यामुळे बालकांसह मुलींच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर होता. डोंगरभागात राहणार्या मुलींचे बाल विवाह रोखण्याबरोबरच कुपोषित बालकांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून मुलींच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी एसटी महामंडळाच्या निळ्या परीचा अधार ठरला आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये 10 ते 15 गावांसाठी एक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळेपासून वेगवेगळ्या गावांचे अंतर तीन किलो मीटर पासून 15 किलो मीटरपर्यंत आहे. मानव विकास योजनेअंतर्गत रोहा, पेण व कर्जत या एसटी बस आगारात निळ्या रंगाच्या आठ एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या एसटीच्या माध्यामतून जांभुळवाडी,दारपे अशा अनेक वाड्यांमधून एसटी बस थेट, शाळा, महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थींनींना पोहचविण्याचे काम करत आहे. एसटीतून 360 मुली प्रवास करत असल्याने त्यांच्या शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
आदिवासीपाड्यांमध्ये राहणार्या मुलींना पाचवीपासून 12 वीपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेता यावे यासाठी निळ्या रंगाची एसटी बस सुरु केली आहे. स्त्री साक्षरतेचे प्रमाण व दारिद्रय रेषेखालील कुटूंबाचे प्रमाण हे दोन निकष विचारात घेऊन मानव विकास योजनेअंतर्गत एसटी बस सेवा सुुरू करण्यात आली आहे. पेण, कर्जत, रोहा या तीन एसटी बस आगारात आठ बसेस आहेत. या बसेसद्वारे मुलींना शाळा, कॉलेजपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे.
दीपक घोडे – विभाग नियंत्रक रायगड विभाग