पोलिसांच्या कारवाईबाबत नागरिकांमध्ये नाराजी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मानीफाटा येथील कार व दुचाकी अपघातामध्ये पती, पत्नी ठार झाले. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त करत कारवर दगडाचा मारा केला. याप्रकरणी दीडशे जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईबाबत स्थानिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.
अलिबाग-मांडवा रस्त्यावरील मानीफाटा येथे दुचाकी व इनोव्हा कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. कार चालकाने काही अंतरापर्यंत त्या दोघांना फरफटत नेले. त्यांच्या जीवाची पर्वा न करता वाहन चालवत राहिला. त्यामुळे या दोघांना जीव गमवावा लागला. या अपघातात आई, वडिलांना गमविल्याने अल्पवयीन मुलगा अनाथ झाला. या घटनेने स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला. कार चालकाला आपल्या शैलीत धडा शिकविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांकडून त्या चालकाला संरक्षण देण्यात आले. त्यामुळे नागरिकांचा राग अधिकच वाढला. अखेर संतापाने पेटलेल्या नागरिकांनी दगडफेड करीत इनोव्हा कारच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर पोलिसांनी दगडफेक करणार्यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शासकीय कामात अडथळा आणि जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन हा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. दीडशे जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले. जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले. ही बाब योग्य ठरत असली, तरी राजकीय वरदहस्त असलेल्या कार चालकाला सांभाळण्याचे काम केल्याने जनतेने आक्रोश केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अब्दूलरौफ अब्दूलकरीम बारुदगर असे या इनोव्हा कार चालकाचे नाव आहे. हा मुंबईमधील सांताक्रुज येथील रहिवासी आहे. गुरुवारी (दि.17) दुपारी नवेदर बेली येथील विश्वास पाटील व त्यांची पत्नी कल्पना पाटील असे दोघेजण मांडवा दिशेने दुचाकीवरून जात होते. साडेतीन वाजण्याच्या सुमारास मानीफाटा येथे आल्यावर भरधाव वेगात मागून येणार्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला व पुरुष कारखाली फरफटत जात होते. तरीदेखील कार चालकाने कार थांबविली नाही. त्यामुळे दुचाकीमधील दोघेही जागीच ठार झाले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंपने करीत आहेत.
कार चालकाविरोधात गुन्हा दाखल
अलिबाग-रेवस मार्गावरील मानीफाटा येथे इनोव्हा कारच्या धडकेने दामप्त्य जागीच ठार झाले. ब्रेक मारून वाहन थांबविणे आवश्यक असताना दोघांना फरफटत नेल्याने त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.