मैत्रिणीसह पर्यटनाला आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

पनवेल | वार्ताहर |
मैत्रिणीसह पनवेल येथे फिरण्यासाठी आलेल्या तरुणाची भरधाव वेगातील मोटारसायकल रस्ता दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल उरण मार्गावर घडली. या अपघातात मृत तरुणासोबत असलेली त्याची मैत्रिण देखील किरकोळ जखमी झाली आहे.

या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव अजित रघुनाथ माटेकर (27) असे आहे.तो घाटकोपर येथील नित्यानंद नगर येथे राहण्यास होता. अजीत आपल्या मैत्रिणीसह फिरण्यासाठी पनवेल येथे आला होता. त्यानंतर अजीत आपल्या हिरो होंडा मोटारसायकलवरुन पनवेल मधील करंजाडे येथून उरणच्या दिशेने जात होता.

यावेळी त्याची मोटारसायकल उरण रोडवरील जेडब्ल्युआर कंपनीजवळ आली असताना, भरधाव वेगात असलेल्या मोटारसायकलवरील अजितचे नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटारसायकल रस्ता दुभाजकावर धडकल्याने तो मैत्रिणीसह खाली पडला. या अपघातात अजितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.या अपघातात त्याची मैत्रीण सुद्धा किरकोळ जखमी झाली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या घटनेत अजितने निष्काळजीपणे भरधाव वेगात माटरसायकल चालविल्यामुळे सदरचा अपघात होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळुन आले आहे.

Exit mobile version