| पनवेल । वार्ताहर ।
समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणार्या शासकीय वसतिगृहाच्या सोयी-सुविधांबाबत विद्यार्थ्यांकडून विविध तक्रारी करण्यात येतात. त्यामुळे शासकीय वसतिगृह संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाज कल्याण विभागाने संवाद हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याच अनुषंगाने मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी पनवेल येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहाला भेट देत वसतिगृहातील समस्या जाणून घेण्यासाठी वसतिगृहातच मुक्काम केला.
समाज कल्याण विभाग आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून समाज कल्याण अधिकारी शासकीय वसतिगृहात मुक्काम करून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींबाबत त्यांच्याशी संवाद साधतात. याच अनुषंगाने समाज कल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कोचुरे यांनीदेखील बुधवारी पनवेल येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहाला अचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींशी विविध गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारताना त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. तसेच विद्यार्थिनींसमवेत भोजन करून वसतिगृहातच मुक्काम केला. यावेळी त्यांनी वसतिगृहात संगणक, वाय-फाय यंत्रणेसोबत प्रत्येकाला शासकीय नियमानुसार भोजन, नाश्ता, फळे, शैक्षणिक सुविधा इत्यादी देण्याबाबतच्या सूचना केल्या.
वसतिगृहातील मुलींना शैक्षणिक प्रगती करण्याबरोबरच कलागुणांना वाव देण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रत्येक मुलीने वसतिगृहात होणार्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास करा, असा मोलाचा सल्ला ही दिला.
वंदना कोचुरे
मुंबई विभाग प्रादेशिक उपायुक्त