पालिकेच्या अभियंताची निर्दोष मुक्तता

। पालघर । प्रतिनिधी ।

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता व आताचे शहर अभियंता दिपक खांबीत यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याच्या आरोप कनिष्ठ अभियंता यशवंतराव देशमुख यांच्यावर करत त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु, पुराव्या अभावी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर, दुसरे कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण मोहिते यांचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.
बोरिवली पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ महापालिकेचे शहर अभियंता दिपक खांबित यांच्यावर 29 सप्टेंबर 2021 रोजी दोन दुचाकीस्वारांकडून गोळीबार करण्यात आला होता. यात खांबीत यांच्या गाडीची काच फुटली मात्र ते वाचले होते. या हल्ल्याची सुपारी महापालिकेत कनिष्ठ अभियंता देशमुख आणि मोहिते या दोघांवर करण्यात आला होता. याच प्रकरणातील दाखल गुन्ह्यात कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या दोन कनिष्ठ अभियंत्यांसह 6 जणांना अटक केली होती.

मोहिते आणि देशमुख दोघेही ऑक्टोबर 2021 पासून न्यायालयीन कोठडीत होते आणि मार्च 2022 मध्ये त्यांना जामीन मिळाला होता. देशमुख यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, अर्जाला 26 ऑक्टोबर 2023 रोजी फेटाळण्यात आले होते. यानंतर त्यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल करण्यात आला होता. तर, दुसरीकडे मोहिते यांनीही मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. यावेळी उच्च न्यायालयाने देशमुख यांचा फेरविचार अर्ज स्वीकारला आणि सोमवारी (दि.26) दिंडोशी सत्र न्यायालयाचा आदेश बाजूला सारत, त्यांना या प्रकरणात दोषमुक्त करण्याचे आदेश पारित केले आहे. तसेच, पुराव्याअभावी न्यायालयाने देशमुख यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर, मोहिते यांचा पुनर्विचार अर्ज फेटाळण्यात आला आहे.

Exit mobile version