मच्छिमारांच्या मदतीला ‘मदर इंडिया’
। पालघर । प्रतिनिधी ।
भाईंदरच्या उत्तन पातान बंदर येथील ‘गॉडवील’ या मच्छीमार बोटीचा पंखा तुटल्याने बोट भरसमुद्रात बंद पडली होती. यावेळी ‘मदर इंडिया’ नावाची बोट बाहेर येत असताना त्यांच्या ही बाब निदर्शनास आली आणि त्यांनी तातडीने मदत करत त्या बोटीला बांधून समुद्र किनार्यावर आणले. समुद्रात अडकलेल्या या बोटीला वेळेवर मदत मिळाल्यामुळे बोटीत अडकलेल्या 18 जणांना जीवदान मिळाले आहे.
जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून मासेमारी करण्यास सुरुवात झाली आहे. मासेमारीसाठी भाईंदरच्या उत्तन पातान बंदर येथील गॉडवील या मच्छीमार बोटीचे नाखवा अलेक्झांडर डग्लस बेळू आणि इतर 17 जण हे मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले होते. परंतु, काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वार्यामुळे मच्छीमार बोटींना किनार्यावर परतण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींनी परत किनार्याकडे परतण्यास सुरुवात केली. यावेळी अलेक्झांडर यांची बोटसुद्धा किनार्यावर परतण्यासाठी निघाली होती. परंतु, किनार्याकडे परतत असताना त्यांच्या बोटीचा पंखा तुटून पाण्यात पडला आणि बोट भरसमुद्रात अडकून पडली. पाऊस आणि वादळी वार्यामुळे या बोटीत हेलकावे घेत 18 जण जीव मुठीत घेऊन बसले होते.
यादरम्यान रविवारी (दि.25) सकाळी एक बोट भर समुद्रात बंद पडून 18 जण अडकल्याची माहिती वायरलेसवरून देण्यात आली होती. यानंतर मदतीसाठी कोस्ट गार्ड, पोलीस, मत्स्य विभागासह मासेमारीसाठी गेलेल्या बोटींच्या नाखवा यांना कळवले असल्याचे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी अलेक्झांडर यांना सांगितले. यावेळी मदर इंडिया नावाची बोटदेखील समुद्र किनार्यावर येत असताना त्यांना गॉडवील ही बोट बंद पडलेली दिसली. त्यांनी धाडस दाखवुन या बंद पडलेल्या बोटीला दोरखंडाच्या सहाय्याने बांधून ती बोट समुद्र किनार्यावर खेचत आणण्यात आली. यामुळे मदर इंडिया बोटीच्या चालकाच्या धाडसामुळे बोटीत अडकलेल्या 18 जणांना जिवनदान मिळाले असल्याचे बर्नाड डिमेलो यांनी सांगितले.
कोस्ट गार्डवर नाराजी
रविवारी सकाळी 7 वाजता बोट बंद पडल्याची माहिती कोस्ट गार्ड यांना देण्यात आली होती. परंतु, त्यांच्याकडुन मच्छीमारांना वाचवण्यासाठी कोणतेही सहकार्य किंवा प्रयत्न करण्यात आले नाहीत. अशा परिस्थीत कोस्ट गार्डने मच्छीमारांचा जीव वाचवणे महत्वाचे आहे. पण खोल समुद्रात अडकलेल्या मच्छीमार बोटीला कोस्ट गार्डने वार्यावर सोडले असल्याचा आरोप मच्छीमारांकडून करण्यात आला आहे.