जीव मुठीत घेऊन शिक्षण
। पालघर । प्रतिनिधी ।
कुडण येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण व जुनी झाली असून शाळेच्या भिंतींना काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच, शाळेच्या छताचा भाग वाकला असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे झटके जाणवले होते. बोईसरपासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू होते. तसेच, कुडण हे गाव या भूकंप केंद्रबिंदूपासून जवळच असल्याने या भागात भीतीचे वातावरण आहे. कुडण येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एनपीसीआयएल कडून सन 2021 मध्ये बांधण्यात आलेले शौचालय निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याचा खालील भाग खचला असून मुलांना शौचालयामध्ये जाताना देखील मोठी कसरत करावी लागत आहे. या शालेय आवारात असलेली अंगणवाडी ग्रामपंचायत मार्फत बाहेरून रंगरंगोटी करून सजवली असली तरी प्रत्यक्षात मात्र अंगणवाडीतील आतील भाग अस्वच्छ असून या इमारतीत वीज जोडणी नसल्याने मुलांना शिक्षण घेतांना अडचणी निर्माण होत आहेत.
यावेळी या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी ग्रामस्थांकडे मागणी केली आहे की, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व आम्ही जीव मुठीत धरून या वास्तूमध्ये बसत असून शासनाने याकडे लक्ष देऊन मोडकळीस आलेली वास्तू दुरुस्त करून द्यावी, अशी विनंती केली आहे. तसेच, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे याच तारापूर विभागातून निवडून आले असल्याने मोडणार्या कुडण शाळेकडे त्यांनी लक्ष देऊन शासनाकडून योग्य निधी उपलब्ध करून शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.